Wednesday, July 31, 2019

मीडिया बदलतोय_Internet and social media transforming indian traditional media

मोबाईल, 4G इंटरनेट आणि सोशल मीडिया यामुळे देशातील मीडिया वेगाने बदलतोय. अभिनेता राहुल बोस हॉटेलने दिलेल्या दोन केळ्यांच्या बिलावर इन्स्टाग्रामवर व्हिडिओ टाकतो... हा व्हिडिओ व्हायरल होतो आणि देशातील परंपरागत मीडियाला त्याची दखल घ्यावी लागते... यथावकाश हॉटेलवर कारवाई होते. ही एक घटना भारतातील मीडियाचं बदलतं स्वरुप दाखवण्यास पुरेशी आहे.



आधी वृत्तपत्र, रेडिओ आणि टीव्ही इथे संबंधित ठिकाणचे वरिष्ठ काय माहिती द्यायची याचा निर्णय घ्यायचे आणि नागरिकांना फक्त तेवढंच समजायचं. आता नागरिक त्यांना वाटेल तो विषय त्यांना रुचेल त्या पद्धतीने लोकांपुढे मांडू शकतात. लोकांना तो पटला तर इंटरनेटमुळे हा विषय व्हायरल होतो आणि परंपरागत मीडियालाही त्याची दखल घ्यावी लागते.



जगात सर्वाधिक व्हॉट्सअॅप युझर भारतात आहेत... व्हॉट्सअॅपचे अपडेट... नेटफ्लिक्सचे व्यसन... पबजी गेमचे चांगले-वाईट परिणाम... टीकटॉक अॅप भारतात राहणार की जाणार? या विषयांच्या बातम्या परंपरागत मीडियाला कराव्या लागतात. चित्रपट आणि टीव्ही मालिकांची समीक्षा करणारे वेब सिरिजचीही समीक्षा करू लागले... एरवी जे विषय पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना कळले नसते ते कोणीतरी ट्वीट करुन किंवा फेसबुक अथवा इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन बड्या नेत्यांना कळवतो. फक्त टॅगिंग करुन विषय थेट वरपर्यंत नेता येतो. त्याची दखल घेऊन कारवाई होते आणि संपूर्ण घटनाक्रमाची बातमी नंतर परंपरागत मीडियाला द्यावी लागते. या घडामोडी परंपरागत मीडिया दुय्यम होत असल्याचे दाखवून देतात.



इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे परंपरागत मीडियाचे महत्त्व कमी होऊ लागले आहे हे मान्य करावेच लागेल. भारतीयांनी कारगिलमध्ये झालेली लढाई टीव्हीवर बघितली, वृत्तपत्रांमध्ये वाचली. पण नरेंद्र मोदी २०१९साठी प्रचार करत असताना तो बघायचा, ऐकायचा की नाही?, याचा निर्णय ज्याच्या त्याच्या हातात होता.  राजकीय भाषणं, मुलाखती, पत्रकार परिषदा हे सर्व फेसबुक, ट्विटर आणि यूट्युबवर उपलब्ध होते... कधी बघायचे?, किती वेळा बघायचे?, त्यावर प्रतिक्रिया द्यायची का?, लाईक-शेअर करायचे का? हे सर्व निर्णय ज्याला-त्याला स्वतंत्रपणे घेण्याची संधी मिळाली. जगातल्या सर्वात मोठ्या निवडणुकीचा प्रचार खिशातल्या मोबाईलमध्ये येऊन पोहोचला.



लोकसभेच्या निवडणुकीत प्रमुख पक्षांनी डिजिटल प्रचारावर ५० टक्के आणि परंपरागत प्रचारावर ५० टक्के खर्च केला असा ढोबळ अंदाज आहे. उमेदवार वृत्तपत्रातल्या बातमीपेक्षा डिजिटल इमेजची जास्त चिंता करत होते. लवकरच देशातल्या पुरोगामी आणि प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात निवडणूक आहे. ही निवडणूक डिजिटल विश्वाला आणखी वेगाने प्रगतीपथावर नेईल. त्यामुळे येणाऱ्या काळात डिजिटल पद्धतीने माहिती आणि मनोरंजन उपलब्ध करुन देण्याला महत्त्व येणार हे निश्चित.

राज्यातला पाऊस, पावसातील दुर्घटना आणि या घडामोडींवरील प्रतिक्रिया यांनी डिजिटल विश्व व्यापून टाकलंय. डिजिटल विश्वाचा मूड बघून परंपरागत मीडिया बातम्या देतोय. हा ट्रेंड बघता येणाऱ्या काळात फिल्डवर गेलेल्या रिपोर्टरला तिथून फेसबुक लाईव्ह कर अशी सूचना 'बाय डिफॉल्ट' दिली जाणार.  टीव्ही, रेडिओ आणि वृत्तपत्र यांच्याकडून माहिती दिली जाण्याआधी डिजिटल विश्वात त्या घटनेचा अनेक अंगांनी आढावा घेतला जाणार हे निश्चित.



5G इफेक्ट

देशात लवकरच 5G इंटरनेट सेवा सुरू होत आहे. ही सेवा सुरू झाल्यावर तर एचडी व्हिडिओ (उच्च दर्जाचे व्हिडिओ) मोबाईलवर बघणे आणि शेअर करणे आणखी सोपे होईल. काय बघायचे आणि काय नाही याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळेल. बातम्या, इतर माहिती आणि मनोरंजन सर्व मोबाईलवर आहेच; त्याच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा होईल. त्यामुळे परंपरागत मीडियाचे महत्त्व एकदम कमी होणार हे निश्चित. या बदलाचा परिणाम परंपरागत मीडियाच्या अर्थकारणावर कसा होतो हे 5G सुरू झाल्यावर २-३ वर्षात दिसेल.

Title - 4g internet and social media transforming indian traditional media 5g internet will transform media more

No comments:

Post a Comment